आर्थिकदृष्ट्या सधन असलेले तरुण काही वयोवृद्ध तर कधी व्यावसायिक यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढत त्यांच्याकडून लाखो रुपयांची लूट करणे असे प्रकार आता सर्रास होत असून असाच एक नवीन प्रकार कोकणात रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे समोर आलेला आहे. अलिबाग येथील एका तरुणाला एका महिलेने तिच्या जोडीदाराच्या मदतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर ब्लॅकमेल करत त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली मात्र पोलिसांनी पद्धतशीर सापळा रचून मुंबईतून आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुण रिअल इस्टेट संदर्भात काम करतो आणि याच दरम्यान त्याची महिलेसोबत ओळख झालेली होती. आरोपी महिला जागा बघण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे आलेली होती मात्र गप्पा झाल्यानंतर तिने त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले आणि परिसरातील एका कॉटेजवर घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि याचा व्हिडिओ बनवला आणि त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.
तक्रारदार व्यक्ती हा यामुळे घाबरून गेला आणि अखेर त्याने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुरुवातीपासून या प्रकरणात जातीने लक्ष घातले आणि आरोपींना खंडणी कुठे नेऊन द्यायची काय करायचे या संदर्भात ते वेळोवेळी तक्रारदार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेत होते. संशयित आरोपी असलेली धनश्री तावरे आणि तिचा मित्र संजय सावंत वेळोवेळी त्याला फोन करून लोकेशन बदलत होते त्यामुळे पोलिसांची देखील चांगलीच धावपळ झाली.
अखेर आरोपी धनश्री हिने फिर्यादी यांना चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे पैशाची बॅग घेऊन येण्यास सांगितली होती त्यानंतर चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात संशयित महिला फिर्यादी यांची वाट पाहत होती. फिर्यादी तिथे गेल्यानंतर या महिलेचा भाचा तिथे आला आणि या भाच्याने पाच लाख रुपयांची बॅग स्वीकारली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा भाचा लहान असून त्याचा या गुन्ह्यात काहीही सहभाग नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले तेव्हा तिने हा गुन्हा आणखी एका इसमाच्या सोबत घेऊन केल्याचे समोर आलेले असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत .