एकीकडे सर्व जग व्हॅलेंटाईन दिवस साजरा करत असताना मुंबईतील एका तरुणाने तरुणीसोबत व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यासाठी गोव्यात धाव घेतली होती अर्थातच त्यांनी या प्रकरणी घरच्यांना कुठलीही खबर दिलेली नव्हती मात्र गोव्यात आल्यानंतर समुद्रात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रेमीयुगुल हे मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडलेली आहे. जीवरक्षकाच्या मदतीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत असल्याचे घोषित केले. मयत मुलीचे नाव सुप्रिया दुबे ( वय 26 ) आणि मुलाचे नाव विभु शर्मा ( वय 27 ) असे असल्याचे समजते.
सुप्रिया दुबे ही सध्या बंगळुरू येथे राहत होती आणि तिचा प्रियकर असलेला विभू शर्मा हा मुंबईत राहत होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून घरातूनही त्यांच्या विवाहाला विरोध नव्हता त्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यासाठी गोव्याला जाण्याचे ठरवले आणि त्यानंतर ते गोव्यात दाखल झालेले होते . समुद्रकिनारी मजा करत असताना समुद्राच्या लाटेत ते वाहून गेले. ही बाब जीवरक्षक पथकाला समजली त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांचा मृत्यू झालेला आहे.
दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर मयत व्यक्तीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान होते मात्र त्यांचे मोबाईल मिळाल्यानंतर त्यातील एक मोबाईल तरुणीच्या हाताच्या बोटाच्या ठशाने अनलॉक करण्यात पोलिसांना यश आले आणि त्यानंतर मुलीची ओळख पटवली त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तरुणाची देखील ओळख पटवण्यात आली. सदर प्रकार उघडकीला आल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे.