काही दिवसांपूर्वी सातारा इथे इयत्ता सहावीतील मुलीला आठवा महिना सुरू असल्याचे प्रकरण समोर आलेले होते त्यानंतर तशीच आणखीन एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेली असून इचलकरंजी शहरात एका साडेतेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत साडेसोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केले आहेत. शेतामध्ये बोलावून तिच्यासोबत तो सतत हा प्रकार करत असल्याने अखेर पीडित मुलगी गर्भवती झाली आणि प्रकरण समोर आले.
सदर घटना समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे. संबंधित मुलगा आणि मुलगी ओळखीचे असून त्याने तिच्यासोबत मैत्री झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तो पंचगंगा नदीच्या काठी तिला बोलावून घ्यायचा आणि त्यानंतर शेतात घेऊन जाऊन आरोपी लैंगिक शोषण करत होता. सदर प्रकार तू कुठे सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील तो धमकी द्यायचा त्यामुळे पीडित मुलगी ही गप्प राहीली.
काही दिवसांनंतर मुलीला पोटात दुखू लागल्यानंतर घरातील व्यक्तींनी रुग्णालयात दाखवले त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालील वाळू सरकली. मुलीच्या आईने आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.