गोवामध्ये निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत .सावंत सरकारमधील एक मंत्री महिलेचे लैंगिक शोषण करीत असून मुख्यमंत्री देखील त्याला पाठीशी घालत असल्याचा धक्कादायक आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. १५ दिवसांत या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून न टाकल्यास नावासह मंत्र्याला उघडे पाडण्याचा तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे तर दुसरीकडे भाजपकडून मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे .
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की , ‘ भाजपच्या या मंत्र्याने सदर महिलेला घर देतो, नोकरी देतो, अशी आश्वासने देऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आणि धमकी देऊन तिला गर्भपात ही करायला लावला. या मंत्र्याने सदर महिलेशी केलेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स, व्हॉट्सॲप चॅट, तसेच व्हिडिओ क्लिप्स मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवले असूनही त्यांनी कारवाई केली नाही उलट हे पुरावे नष्ट करण्याचे काम केले. पोलिसांचा वापरही मुख्यमंत्र्यांनी केला आहे . संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही एका बेकायदा व्यवसायात भागीदार आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असावेत.’
काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बोलताना हे आरोप फेटाळले असून ‘चोडणकर यांनी मंत्र्याचे नाव न घेता हवेत बाण मारला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडी अशी बेजबाबदार विधाने शोभत नाहीत. वैयक्तिक आरोप करताना त्यांनी मंत्र्याचे नाव घ्यावे. या प्रकरणात कथित पीडित महिलेने तक्रार केलेली नाही त्यामुळे आरोपाबाबत संशय घेण्यास वाव आहे.’ असे म्हटले आहे .