पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकावल्याप्रकरणी अखेर एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली असून पुणे पोलिसांनी मुंबईत जाऊन ही कारवाई केलेली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला व्हाट्सअपवर मेसेज करून खंडणीसाठी धमकी देण्यात आलेली होती. भारती विद्यापीठ पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याने कुणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली होती याचा सध्या तपास सुरू आहे.
वसंत मोरे यांनी यानंतर एक फेसबुक पोस्ट केलेली असून त्यामध्ये ‘ कानून के हात बहुत लंबे होते है ‘ असे म्हटलेले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार देखील व्यक्त केलेले असून अटक केलेला आरोपी हा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का ? त्याची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आलेली होती
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांना व्हाट्सअपवर एक अल्पिया शेख नावाने हा मेसेज आला होता आणि त्यात त्यांना तीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आलेली होती. तुझ्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट करण्यात आलेले आहे . 30 लाख रुपये दे नाहीतर या सर्टिफिकेटचा गैरवापर करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती त्यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकात एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.