पुण्यात प्रेमप्रकरणातून ‘ अपहरणनाट्य ‘ , तरुण अखेर सापडला पण..

सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख असल्याकारणाने अनेकजण पुण्यात शिक्षणासाठी येत असतात मात्र गेल्या काही वर्षात पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पुणे शहरात समोर आलेला आहे. पुण्यातून एका 25 वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आले असून प्रेमप्रकरणातून ही घटना घडलेली आहे . संबंधित तरुणाला मारहाण करत आणि परत त्या मुलीसोबत संबंध न ठेवण्याच्या अटीवर या तरुणाची अखेर सुटका करण्यात आलेली आहे. शनिवारी अकराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शिवलिंग दिगंबर गायकवाड ( वय ३० ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर बसवंत माधव गायकवाड ( वय 25 ) असे सुखरूप सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बसवंत हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून पुण्यात आलेला असून संबंधित तरुणी देखील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात आलेली आहे . मुळची ती परभणी जिल्ह्यातील असून त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांना या संदर्भात कुजबूज कानी आलेली होती.

मुलीच्या नातेवाईकांनी त्यानंतर संतप्त होत शनिवारी रात्री पुणे गाठले आणि अकराच्या सुमारास जेवण करून मुलगा रूमवर जात असताना त्याला चार चाकी गाडीत ओढले आणि त्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले. त्याच्यासोबत असणाऱ्या मुलांनी ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी हा मुलगा सुखरूप असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचा देखील जीव भांड्यात पडला.

बसवंत याने दिलेल्या माहितीनुसार त्याला पाईपने मारहाण करण्यात आली अन मुलीच्या कुटुंबीयांनी समोरासमोर बसून आम्हाला विचारपूस केली तसेच प्रेमप्रकरण थांबवण्याचे सांगत यापुढील काळात आपण त्या मुलीला संपर्क करणार नाही असे वदवून घेत त्यानंतर आपली सुटका केली असे सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.