शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या एका खळबळजनक अशा प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून शहरातील विश्रांतवाडी भागातील हे प्रकरण आहे . अंधश्रद्धेमुळे एका महिलेला ज्या प्रकारे त्रास देण्यात आला त्यावर सध्या सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात असून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या प्रकारावर संताप व्यक्त केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलाही विश्रांतवाडी येथील रहिवासी असून काही वर्षांपूर्वी तिचा बीड जिल्ह्यातील एका तरुणासोबत विवाह झालेला होता. सध्या ती तिच्या माहेरी राहत असून सासरी राहत असताना या विवाहित महिलेने आपल्या मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा दावा केलेला आहे . पोलिसांनी त्यानंतर महिलेचा पती, सासू-सासरे , दीर, मावसदीर आणि एका व्यक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.
दोन वर्षांपूर्वी या महिलेचा आणि तिच्या पतीचा प्रेमविवाह झालेला होता त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला छळण्यास सुरुवात केली. सासरचे कुटुंबीय हे अघोरी विद्येच्या आधीन गेलेले असून त्यांनी पीडित महिलेला चक्क तिचे मासिक पाळीमध्ये आलेले रक्त देण्यासाठी हातपाय बांधून तिचा छळ केलेला होता. 50 हजार रुपयांना हे रक्त विकण्यासाठी त्यांनी तिला त्रास दिला असे देखील तिने म्हटलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.