पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची चांगलीच दहशत निर्माण झालेली असून स्वारगेट परिसरातदेखील या टोळीने धुमाकूळ घातलेला आहे. 14 जणांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली असून या टोळीचा म्होरक्या मात्र अद्यापपर्यंत फरार होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सचिन माने असे त्याचे नाव असून तो त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेला असताना पोलिसांच्या ताब्यात आला आहे . घोरपडी परिसरात पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून कोयते, कुऱ्हाड अशी घातक शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत.
सचिन माने हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घोरपडी पेठ येथे येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या वेळेस सापळा रचला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने पोलिसांवरच कोयता उगारला. त्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झालेले असून त्याच्यावर आतापर्यंत 14 गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.