रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या विविध भागाला मुंग्यांचा ‘ घनघोर चावा ‘

Spread the love

राज्यातील रुग्णालयातील दशा आणि दुर्दशा याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात . अशीच एक घटना अमरावती इथे उघडकीस आली असून अर्धांगवायू झालेल्या एका रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असताना त्याच्या शरीराच्या अनेक भागावर मुंग्यांनी चावा घेतल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे . अमरावती शहराच्या पंचवटी चौकात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा प्रकार उघडकीस आला असून रुग्णाचे वय हे ७१ वर्षे असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार, विष्णूपंत साठवणे (वय ७१) असे रुग्णाचे नाव असून काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. ते घरीच उपचार घेत होते मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी अमरावती शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर लाल मुंग्यांनी चावा घेत जीवघेणा हल्ला केला.

विष्णूपंत साठवणे यांच्या एका डोळ्याखाली व शरीराच्या दुसऱ्या एका भागावर मुंग्यानी चावून मोठ्या जखमा केल्या होत्या. सकाळी रुग्णाच्या नातेवाइकांचे लक्ष गेल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाइकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने डॉ. पंजाबराव रुग्णालयातील आरोग्य सुविधेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.


Spread the love