शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून भाईगिरीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पिंपरी परिसरात अशीच एक घटना समोर आलेली आहे. सलूनच्या दुकानात चेहरा फ्रेश केल्यानंतर कामाचे वीस रुपये मागितले म्हणून सलून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्या दुकानाची काचही फोडण्यात आली. चिखली पोलिसांनी आरोपीना बेड्या ठोकलेल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, आदर्श विठ्ठल लुडेकर ( वय 22 वर्ष राहणार चिखली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार असलेला आदित्य शिंदे ( राहणार चिखली ) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी भूषण लक्ष्मिकांत महाले ( वय 26 राहणार चिंचवड ) यांनी चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी भूषण महाले यांचे चिखली येथील सलून दुकानातून मंगळवारी 21 तारखेला संध्याकाळच्या सुमारास ते काम करत असताना दोन आरोपी त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी चेहरा फ्रेश करून देण्यास सांगितला. फिर्यादी महाले यांनी दोघांचाही चेहरा फ्रेश करून दिला आणि त्यानंतर कामाचे 20 रुपये मागितले.
पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपी हे फिर्यादीला म्हणाले की, ‘ तू आमच्याकडे पैसे मागतो .. आम्हाला ओळखत नाही का ? थांब तुला दाखवतो आम्ही कोण आहोत ते ? ‘ , असे म्हणत त्यांनी फिर्यादीला मारहाण केली आणि बाहेर जाऊन लोखंडी पाईप आणला आणि सोबत सलूनच्या काचा फोडल्या व इतर सामानाची देखील नासधूस केली . पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.