महाराष्ट्रात एक अजब घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली असून आपल्या राहत्या घरातून गायब झालेली अल्पवयीन मुलगी आत्याच्या घरी आढळून आलेली आहे . तिला लग्नाचे आमिष दाखवत पळून नेल्याचा गुन्हा युवकावर दाखल केलेला असून दोन दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महेश मोरे ( वय 20 ) असे या तरुणाचे नाव असून त्याचे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्याची कुणकुण घरी लागल्यानंतर आई-वडिलांनी मुलीचे लग्न करण्याचे ठरवले मात्र त्यापूर्वीच ही मुलगी घरातून गायब झालेली होती. मुलीच्या घरच्यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी ही मुलगी तिच्या आत्याच्या घरी आढळून आली.
आरोपी महेश मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने आपण दोघेही अडचणीत येऊ शकतो म्हणून महेश याने तिला काही महिने लग्नासाठी थांबण्यास सांगितले होते. 27 मार्च रोजी हदगाव बसस्थानकात सीसीटीव्ही पोलिसांनी चेक केले त्यावेळी मुलगी एकटीच बस मध्ये बसून गेल्याचे दिसून आलेले होते. गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आत्याच्या घरी पोहोचले त्यावेळी ही मुलगी तिथे आढळून आली.