महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरानजीक चिखली इथे उघडकीस आली आहे. पतीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं थायरॉईडच्या 50 गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.घटना समोर आल्यावर सदर पतीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमोल मारुती भंडारे (वय ३७ ) असे आरोपी पतीचे नाव असून तो चिखली येथील साने चौक परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पती अमोल याने सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत फिर्यादीला विविध कारणांसाठी त्रास दिला असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे . आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीनं थायरॉईड आजारावरील पन्नास गोळ्या खाल्ल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिची प्रकृती सुधारत असल्याचे वृत्त आहे .
आरोपी पती अमोल याने घराचं आणि चारचाकी वाहनाचं कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी केली होती. माहेरहून पैसे आणून मला द्यावेत अशी तो सातत्याने मागणी करत होता तसेच माहेरच्या लोकांच्या नावाने शिवीगाळ करत फिर्यादीला टोमणे मारत होता. आरोपी पती दारू पिऊन रात्री अपरात्री घरी येत पीडितेला मारहाण करायचा तसेच तिला उपाशीपोटी झोपवायचा.
गेल्या बऱ्याच काळापासून फिर्यादीला पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेनं गुरुवारी थायरॉईड आजारावरील 50 गोळ्या खाल्ल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.चिखली पोलिसांनी कौटुंबीक हिंसाचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.