‘ तज्ज्ञ कायद्याचा मात्र धंदा फायद्याचा ‘, ‘ ह्या ‘ वयोगटातील महिला असायच्या निशाण्यावर

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबईत उघडकीस आली असून ऑनलाईन मॅट्रीमोनिअल साईटवरून महिलांना लग्नाचं आमिष दाखवत त्यांना आर्थिकदृष्टया चांगलाच चुना लावणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी चक्क वकिलीचे शिक्षण घेत होता आणि तब्बल आठ वर्षांपासून त्याचा हा काळा धंदा सुरु होता. दरम्यानच्या काळात आरोपीनं तब्बल 12 महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे तपासात उघड झाले असून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं त्याला अटक केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सतीश गरुड असं अटक केलेल्या भामट्या तरुणाचं नाव असून आरोपी सतीश गरुड हा क्रिमिनल सायकोलॉजी आणि एलएलबी च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता मात्र त्याने शिक्षण सोडून दिले आणि आपल्या ‘असल्या ‘ कौशल्याचा वापर करत महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. आरोपीनं आतापर्यंत लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 12 महिलांची फसवणूक केली असून त्यांना लाखो रुपयांना चुना लावला आहे.

साधारण ३० वर्षाच्या पुढील तरुणी अथवा महिला ह्या लवकर लग्न जमत नसल्याने चिंतेत असल्याची बाब हेरून हा त्याच वयोगटातील महिलांना टार्गेट करत होता . काही घटस्फोटीत महिलांना देखील लग्नाचे आमिष दाखवत आरोपीनं आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची फसवणूक केली.

2013 पासून आरोपीनं हा उद्योग सुरू केला होता. आरोपी अत्यंत गोड बोलून महिलांना आपल्याकडे आकर्षित करायचा आणि त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर काही ना काही कारण सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत होता.आरोपी सतीश गरुड हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.


Spread the love