देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आली आहे .7 नोव्हेंबर रोजी बरेली येथे सशस्त्र दरोडा पडला होता.पोलिसांनी तपास सुरु करत विक्रमी वेळेत गुन्हेगाराला गजाआड केले असून भूत आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी भूत आणि त्याच्या टोळीला अटक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, 7 नोव्हेंबर रोजी बरेली येथील नबाबगंज परिसरात प्रसिद्ध व्यापारी जलीस अहमद पत्नी आणि मुलांसह घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. त्याच वेळी सुमारे डझनभर मुखवटाधारी हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले आणि हत्याराच्या जोरावर त्यांना वेठीस धरले.रोख आणि दागिन्यांसह सुमारे 12 लाखांचा ऐवज लुटला आणि फरार झाले.
पोलीस तपास सुरु असताना परिसरातील गुन्हेगारी जगतामध्ये भूत नावाने प्रसिद्ध असलेल्या फरहानच्या टोळीनेच हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी भूत टोळीच्या 10 दरोडेखोरांना अटक केली आहे. तर दोन चोरटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून पाच पिस्तुलांसह व्यापाऱ्याच्या घरातून लुटलेले दागिने आणि अडीच लाखांच्या रोख रक्कम जप्त केली आहे.
भूत नावाने गुन्हेगार फरहान प्रसिद्ध होण्याची कहाणी देखील तितकीच विचित्र आहे . बरेलीतील सुभाषनगर येथे राहणारा फरहान हा या टोळीचा म्होरक्या असून फरहान रात्रभर भटकंती करायचा आणि दिवसा मात्र झोपून रहायचा त्यामुळे त्याचे भूत असे नाव पडले. हळूहळू संपूर्ण परिसर त्याला फरहान ऐवजी भूत नावानेच ओळखू लागले.तो गुन्हेगारीच्या जगात आला तेव्हा त्याच्या टोळीचे नावही भूत गँग झालं. भूत नावाच्या भीतीनं छोट्या टोळ्या त्याच्या समोर येण्याचे धाडस देखील दाखवत नाहीत मात्र सध्या सगळ्या भूत सदस्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
भूत टोळीला अटक करणाऱ्या टीमचे प्रभारी एसपी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, अटक केलेल्या फरहान उर्फ भूत, मनजीत, इर्शाद अहमद उर्फ भुरा उर्फ इशरार, इस्तकार उर्फ गंठा, आमिर, राजू खान, दानिश, अकील खाँ उर्फ कल्लू उर्फ कलवा, संजीव उर्फ गुड्डू, रोज वारसी उर्फ रोज उर्फ शाहबाज खान उर्फ बिहारी अशी नावे आहेत. त्याचवेळी मुसाहिद उर्फ अजय, रुस्तम अशी त्याच्या फरार साथीदारांची नावे आहेत. भूत टोळीची ही पहिलीच घटना आहे असे नाही. या सर्वांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.