पुणे हादरले.. प्रेयसी आणि प्रियकराच्या वादात तिच्या मामाची एंट्री झाली अन त्यानंतर

Spread the love

पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून कोथरूड परिसरात एका तरुणानं आत्महत्या केली आहे.तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्याने सदर तरुण हा घाबरून गेला आणि त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं सुसाईड नोट देखील लिहिली असून या सुसाईड नोटच्या आधारे कोथरूड पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल केला असून वृत्त लिहीपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार , मृत प्रियकर तरूण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी असून त्याचे कोथरूड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमसंबंध सुरु झाल्यावरच त्यांच्यात वेगवेगळ्या कारणावरून खटके उडत होते. प्रेयसी आपल्याला फसवत असल्याची भावना तरुणाच्या मनात होती आणि त्यातून त्याचे प्रेयसीसोबत वाद देखील झाले होते .

एकतर प्रेयसी तरुणाचे ऐकत नव्हती तर दुसरीकडे त्याच्या प्रेमसंबंधाची माहिती प्रेयसीच्या मामाला मिळाल्याने तरुणाच्या अडचणी आणखी वाढल्या. ‘तू तिचा नाद सोड नाहीतर…’ अशी धमकी मामाने संबंधित तरुणाला घरात घुसुन दिली होती त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तरुणाच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे.

सुसाईड नोटमध्ये तरुणानं आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं असून त्यामध्ये प्रेयसीसह तिच्या मामाचं नाव नमूद केलं आहे. सुसाईड नोटच्या आधारे कोथरूड पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या मामाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.


Spread the love