‘ ते गुलाबजामुन तुमचे नाहीत ‘ म्हणताच पुण्यात मंगल कार्यालयात तुंबळ मारामारी

Spread the love

पुण्यात एक अजब घटना समोर आलेली असून लग्नात उरलेले गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झालेली आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शेवाळेवाडी येथील ही घटना असून ज्यांच्या घरात विवाह होता ते नातेवाईक आणि केटरिंगचे चालक यांच्यात हा वाद झालेला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेवाळेवाडी येथील राजीव मंगल कार्यालय येथे रविवारी लोखंडे आणि कांबळे परिवाराचा विवाह सोहळा होता. संजय लोखंडे यांनी हे मंगल कार्यालय बुक केलेले होते तर जेवण पुरवण्याची व्यवस्था गुप्ता यांच्याकडे होती.

लग्नकार्य पार पडल्यानंतर सर्व पाहुण्यांचे भोजन झाले आणि सर्व वऱ्हाडी मंडळी आपापल्या घरी निघून गेले. संध्याकाळी सहाच्या सुमारास नवरदेवाकडील एक व्यक्ती किचनमध्ये गेली आणि त्याने उरलेले जेवण आम्हाला घेऊन जायचे आहे असे सांगितले. केटरिंग चालकाने कुठलाही आक्षेप न घेता राहिलेले जेवण डब्यामध्ये भरून देण्यास सुरुवात केली मात्र वर पक्षाकडील एक व्यक्ती तिथे असलेले गुलाबजाम देखील डब्यात भरू लागला त्यावेळी केटरिंगचे चालक गुप्ता यांनी हे गुलाबजामून उद्याच्या लग्नाच्या तयारीसाठी आहेत असे सांगितले. तुमचे हे गुलाबजामून तुमचे नाहीत असे सांगितल्याचा वर पक्षाकडील व्यक्तीला राग आला.

तीन जणांनी गुप्ता यांना हाताने मारहाण केली आणि एका व्यक्तीने तर चक्क लोखंडी झारा मुक्ता यांच्या डोक्यात मारला. दरम्यानच्या काळात गुप्ता यांचे ओळखीचे लोक तिथे आले आणि त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.


Spread the love