पुणे जिल्ह्यात अनेकजण पोटापाण्यासाठी देशातील विविध भागातून येऊन काम करतात मात्र अनेकदा स्थानिक तरुणांना यामुळे रोजगार मिळत नाही म्हणून परप्रांतीय विरुद्ध स्थानिक यांच्यात संघर्ष देखील होतो मात्र मुंबईतून आलेले व्यक्ती देखील सहन होत नसल्याचे एक प्रकरण रांजणगाव एमआयडीसी जवळ समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील करडे इथे शाळेच्या समोरून जाणाऱ्या कामगारांना अडवत ‘ तुम्ही मुंबईवाले इथे कशाला आले ? तुमच्यामुळे आम्हाला काम मिळत नाही इथं कामाला यायचं नाही ‘ असं म्हणून मारहाण करण्यात आलेली आहे.
मुंबई ही महाराष्ट्रातच असून महाराष्ट्रातीलच व्यक्तीला अशा पद्धतीने मारहाण करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. बाबाजी दत्तात्रय गायकवाड ( वय 36 राहणार रामलिंग रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी विकास सरोदे, संकेत महामुनी ,अभिषेक मिसाळ ( सर्वजण राहणार सरदवाडी तालुका शिरूर ) यांच्यासह इतर चार अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
करडे येथील एका कंपनीचे काम करणारे तक्रारदार व्यक्ती हे जात असताना आरोपी यांनी त्यांना अडवले आणि ‘ तुम्ही मुंबईवाले इकडे कुठे आले तुमच्यामुळे आम्हाला काम मिळत नाही उद्यापासून येथे कामाला यायाचे नाही. आम्हाला विकास सरोदेने आज फक्त समजावून सांगायला पाठवलेले आहे उद्या जर इथे आला तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही ‘ असे म्हणत शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केलेली आहे. बाबाजी गायकवाड त्यांना समजावून सांगत असताना आरोपी युवकांनी त्यांना शिवीगाळ केली आणि पुण्यात परत यायचेच तुझे बंद करतो असे देखील धमकी दिली. पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.