‘ तू लोणीला आल्यावर आपण दोघे..’, लोणीतील ‘ त्या ‘ महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथे झालेल्या महिलेच्या हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून आरोपीने त्याच्या पुतण्याच्या मदतीने सदर महिलेची हत्या केल्याचे हे प्रकरण असून मुख्य आरोपी हा लोणी बाभळेश्वर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये वेटर असल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सोमवारी रात्री हॉटेल पाकिजामध्ये काम करणाऱ्या रंजना विश्वनाथ मोहिते हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने आरोपींना शोधणे आरोपी कोण हे शोधणे मोठे अवघड होऊन बसले होते मात्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, मोबाईल सेल यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या २४ तासांत प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

भारत तुकाराम लष्करे (वय २२ राहणार चक्कर गल्ली, बायपास रोड, धुळे) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता तसेच तो हॉटेल पाकिजा परिसरातच राहायला होता . काही दिवसांपूर्वी त्याची आणि रंजना यांची वादावादी झाली होती त्यामुळे त्याने रंजना हिला धडा शिकवायचा म्हणून त्याच्या पुतण्याला लोणीला बोलावून घेतले आणि चक्क किचनमधील लोखंडी पळीचा वापर करत रंजना यांचा खून केला.

हॉटेलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही शोधले त्यात आरोपीची चालण्याची स्टाईल पोलिसांच्या ध्यानी आली आणि गुप्त सूत्रांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. भारत लष्करे याची चालण्याची पद्धत आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या एका संशयिताची चालण्याची पद्धत तंतोतंत जुळत असल्याने पोलिसांनी लोणी गावातून त्याला ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली .


Spread the love