नगर जिल्ह्यात गाजलेल्या पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी) याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. २८ ऑगस्ट २०२१ पासून आरोपी मोरे पसार होता. लघवीला जाण्याच्या बहाण्याने नगर सिव्हिल हॉस्पिटल येथून हा आरोपी पसार झाला होता . पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पसार झाल्याने नगर पोलिसांची देखील चांगलीच नाचक्की झाली होती मात्र कान्हू मोरे याला पुन्हा बेड्या ठोकणात आल्या आहेत.
राहुरी येथे ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार दातीर यांचे अपहरण करून जबरी मारहाण करून खून करण्यात आला होता. मुख्य आरोपी मोरे याला घटनेनंतर बाराव्या दिवशी १८ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती मात्र न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी मोरे याला कोरोनाची बाधा झाली. त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आणि पुढे त्याला पुणे इथे हलवण्यात येणार असतानाच ॲम्बुलन्स चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि या गोंधळात लघुशंकेच्या बहाण्याने आरोपी मोरे याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले .
कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पोलिस नाईक भगवान किसन पालवे व गणपत जयवंत झरेकर यांना निलंबित करण्यात आले होते. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे पथक शोध घेतांना आरोपी माेरे मध्यप्रदेशातील बडवा जिल्ह्यात राहात असल्याची माहिती मिळाली. परंतु खबर मिळताच तो तेथून पसार झाला होता . पोलीस त्याचा शोध घेत असतानाच राहुरीत तालुक्यात गुहा फाट्याजवळ मळगंगा मंदिरात आरोपी माेरे वेशांतर करून राहत असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली आणि पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पळत मंदिराभोवती सापळा लावून माेरे याला ताब्यात घेतले असून त्याला आता नगर ताेफखाना पाेलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
नगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता .रोहिदास राधुजी दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) असे मृत पत्रकाराचे नाव होते . रोहिदास स्कुटीवर (एमएच १२ जेएच ४०६३) घरी चालले होते त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केले होते. घटनास्थळी त्यांची दुचाकी व पायातील चपला पडल्या होत्या. रोहिदास यांच्या पत्नी सविता दातीर (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.
तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात वाहन (एमएच १७ एझेड ५९९५) मधून अपहरण झाल्याचे दिसून आले. सदर वाहन हे कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांच्या मालकीचे असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर अपहरण झालेले दातीर व वाहनमालक मोरे यांचे मोबाईल स्विच ऑफ आढळून आले होते .
तपास सुरु असतानाच दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर रोटरी रक्तपेढी जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला होता. मृताच्या गळ्याभोवती उपरणे व हाता-पायाला बेदम मारहाण केल्याचे दिसून आले होते. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनि शिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, निरज बोकील, श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक सानप, नगर येथील श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते .