महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते मात्र एका व्यक्तीने आपले आडनाव भोसले असल्याचा फायदा उठवत चक्क आपण शिवरायांचे वंशज आहोत असे सांगत अनेक महिलांची मॅट्रिमोनिअल साईटद्वारे फसवणूक केल्याचे संतापजनक प्रकरण समोर आले असून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे . सदर आरोपी हा पुणे येथील रहिवासी असून त्याचे नाव युवराज भोसले (वय ४१) असल्याचे समजते.
युवराज भोसलेला मुंबई सायबर पोलिसांनी मुंबईतील एका ३१ वर्षीय महिलेची मॅट्रिमोनिअल साइटद्वारे ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली असून त्याच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . त्याच्या असल्या कारनाम्यांनी त्याने सुमारे डझनभर महिलांची फसवणूक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला अटक केल्यावर देखील अनेक महिलांचा तो असा असू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. ज्यांच्यासोबत सुखी संसाराची स्वप्ने त्यांनी रंगवली त्याला बेड्या पडलेल्या पाहून अनेक महिलांना धक्का बसला आहे .
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले याच्याविरुद्ध कळवा पोलिस स्टेशन (ठाणे), खडकपाडा पोलिस स्टेशन (कल्याण) आणि विरार पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळवा पोलिस ठाण्यात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कळवा येथील प्रकरणातील तक्रारदार ही ठाण्यातील घटस्फोटित असून भोसलेने तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला आहे तर कल्याण येथील प्रकरणात भोसले याने मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून पीडितेला फसवले तर विरार पोलिसांच्या प्रकरणामध्ये हा नराधम मुलींना मॉडेलिंगमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ तो महिलांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी (भोसले) महाराजांचे आठवे वंशज असल्याचे सांगत असे तसेच आपल्याकडे खूप पैसे असून लग्न करण्याचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास जिंकायचा . लग्न ठरले की आयकर विभागाने आपल्या घरावर रेड टाकली आहे आणि तब्बल आठ कोटी रुपये जप्त केले आहेत असे सांगून विविध पद्धतीने त्यांच्याकडून मदत घेण्याच्या बहाण्याने पैसे उकळत असे . सदर फसवणुकीमध्ये त्याचा एक साथीदार आर रेड्डी यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आलेले पैसे रेड्डी यांच्या अकाउंटवर घेऊन युवराज त्या बदल्यात रेड्डीला कमिशन देत असे.’
सतीश, राजे वीर आणि वीरेंद्रसिंह बाळासाहेब भोसले अशी नावे वापरणाऱ्या भोसले यांच्यावर यापूर्वी फसवणूक आणि खंडणीचे ११ गुन्हे दाखल आहेत. युवराज भोसले हा प्रामुख्याने घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत पार्श्वभूमी असलेल्या महिलांना लक्ष्य करत होता. तो भावनिकदृष्ट्या कमकुवत अशा स्त्रियांना त्रास देत होता तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांनाही तो अडकवत असल्याचे समोर आले आहे . कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोनही आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .