महाराष्ट्रात सध्या चांगलेच राजकीय घमासान सुरु असून पक्षबांधणीसाठी निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या मनसेला पुण्यातून मोठा हादरा बसलेला आहे. मनसेच्या डँशिंग नेत्या रुपालीताई पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलेला असून त्या लवकरच दुसऱ्या पक्षात जाणार असून अद्याप पर्यंत त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे सांगितलेले नाही. रुपाली पाटील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधण्याच्या सर्वत्र चर्चा असताना त्यांनी शिवसेना नेत्यांची देखील भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे .
रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
रुपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे पाटील मनसेला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहिल. यापुढेही आपले आशीर्वाद आणि राज साहेब ठाकरे हे नाव ह्रदयात कायम राहिल, अशा भावनिक शब्दांचा उल्लेख त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. पक्षांतर्गत वादामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्या मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष होत्या.