महाराष्ट्रात एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात समोर आलेली असून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करून संसार थाटला मात्र लग्नाला तीन महिने झाले आणि विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आष्टी तालुक्यातील ठोंबळ सांगवी येथील ही घटना असून अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पायल आदेश चौधरी ( वय वीस वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव असून पायलचे लग्नाआधीचे नाव पायल गोंदकर असे होते. आदेश चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले आणि सासू आणि पती यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती . पती अहमदनगर इथे गेलेला असताना पायल हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पायल हिचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे ( राहणार कुसडगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर ) यांनी यासंदर्भात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला असून आदेश चौधरी , सासु अलका चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.