पुण्यातील जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने नातेसंबंध आता दुय्यम ठरत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ‘ वैशाली हॉटेल ‘ संदर्भात देखील हाच प्रकार घडलेला असून फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हॉटेलमध्ये एका टोळक्याने तोडफोड करून कामगारांना मारहाण केलेली आहे याप्रकरणी हॉटेल मालकाच्या जावयासह डेक्कन पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विश्वनाथ विनायक जाधव, इरफान शेख ,सुशील सांडभोर आणि विकास चौधरी ( सर्वजण राहणार डेक्कन जिमखाना ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून निकिता जगन्नाथ शेट्टी ( राहणार डेक्कन ) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 29 तारखेला वैशाली हॉटेलमध्ये आरोपी विश्वजीत जाधव आणि त्याचे काही साथीदार घुसले आणि त्यांनी हॉटेलची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना दमदाटी करत त्यांच्यावर हल्ला चढवला.
वैशाली हॉटेलचे कुलमुखत्यारपत्र बंदुकीच्या धाकाने नावावर करून घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विश्वजीत विनायक जाधव ( वय 38 ) या व्यक्तीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी जाधव फिर्यादी निकिता शेट्टी यांचे पती असून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसपथक घटनास्थळी गेले त्यावेळी आरोपीने हॉटेल माझ्या नावावर करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत माझ्याकडे आहे असे सांगितले मात्र पोलिसांनी आदेशाची प्रत मागितली त्यावेळी त्याच्याकडे ती आढळून आली नाही त्यानंतर पोलिसांनी जाधव याच्यासोबत चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे.