देशात एक धक्कादायक घटना समोर आली असून या पूर्ण देशात या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. देशात महिलांवर अत्याचार सतत वाढत असून ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. नवी दिल्ली इथे असाच एक प्रकार उघडकीस आला असून बिअर बारमध्ये बारचा मालक आणि त्याच्या उद्दाम मित्रांपासून सुटका करून घेण्यासाठी एका प्रोफेशनल डान्सरने इमारतीच्या छतावरुन चक्क उडी घेत आपला जीव दिल्याची घटना समोर आली आहे .
आपली कला सादर करण्यासाठी तसेच चार पैसे मिळतील या आशेपायी ही तरुणी एका बीअरबार मध्ये डान्स करत असायची. बिअर बारमध्ये बारचा मालक व त्याचे उद्दाम मित्र हे सातत्याने तिची छेड काढत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते . सातत्याने त्यांचा हा त्रास ती सहन करत होती मात्र अखेर तिचा संयमाचा बांध तुटला आणि तिने इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. राखी असे या दुर्दैवी डान्सरचे नाव असून ती दिल्लीतील बुध विहार येथील रहिवाशी असल्याचे समजते. डान्सरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन बार मालक विजय आणि त्याच्या मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
रोहिणी सेक्टर 9 च्या नॉर्थ एक्स मॉलमधील बिअर बार (मास्टर द पार्टी हॉल) मध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी म्हणून डान्सर निशा आणि त्यांची लहान बहिण राखी उर्फ तान्या डान्स करण्यासाठी आल्या होत्या. पहाटे साडे चार वाजता दोन्ही बहिणीकडे घराकडे निघाल्या असता बार मालक आणि त्यांच्या मित्रांनी दोघींना रोखले आणि पुन्हा डान्स करण्यासाठी त्यांना त्रास देऊ लागले तसेच त्यांच्याभोवती गराडा करून त्यांच्याशी अश्लील वर्तन देखील करू लागले.
दोन्ही बहिणींनी त्यांच्याशी असे वर्तन करू नये म्हणून विनवणी केली मात्र दारूच्या नशेत असलेल्या नराधमांनी त्यांना त्रास देणे सुरूच ठेवले त्यामुळे अखेर स्वत:ची इज्जत वाचविण्यासाठी राखीने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन उडी घेतली. घाबरलेल्या आरोपींनी त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या राखी आणि निशाला आंबेडकर रुग्णालयाबाहेर सोडून आरोपींनी तेथून पळ काढला . डॉक्टर आले मात्र तोवर राखी हिचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडून बार मालकाची कसून चौकशी करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.