महाराष्ट्रात आर्थिक अडचणीत तसेच शेती व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी मुली मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे मात्र याचाच फायदा घेत काही लोकांनी चक्क लग्नासाठी मुली देण्याची दलाली सुरु केली असून या दलालांना कुणाचे भय राहिलेले नाही. चक्क विवाहित महिलांचे देखील पुन्हा लग्न लावण्याचे प्रकार याआधी उघडकीस आले आहेत.
कोल्हापूर पोलिसांनी अशाच एका टोळीचा पर्दाफाश केला असून तीन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे . राधानगरी पोलिसांनी ही कामगिरी केली असून म्हासुर्ली पैकी जोगमोडी वाडी येथील विक्रम केशव जोगम (वय २४) यांनी याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
उपलब्ध माहितीनुसार , विक्रम जोगम यांचा विवाह दि.२२ जून २०२१ रोजी म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय ३८, रा.चांदणी चौक तारदाळ ता. हातकणंगले) हिच्याशी झाला होता. विवाह ठरविण्यासाठी मध्यस्त म्हणून असलेल्या संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबु शेख, समिना फिरोज शेख (रा.शाहुनगर चंदुर सध्या रा.ठाकरे चौक जवाहरनगर इचलकरंजी) यांनी फिर्यादीकडून हा विवाह जमवून आणण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये घेतले होते.
सदर विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवली असल्याचे विक्रम जोगम यांचे म्हणणे आहे त्यानुसार संबधीतांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथुन राधानगरीचे पोलीस निरीक्षक आण्णासो कोळी, पो.कॉ. सुरेश मेटील यांनी ताब्यात घेत जेरबंद केले आहे . सदर टोळीकडून आणखी कुणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांनी केले आहे.