देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या मध्य प्रदेशातील रेवा इथे समोर आलेले असून एका पतीने पत्नीचा मृतदेह चक्क फ्रीजमध्ये ठेवल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या बहिणीची हत्या केली असावी अशी तक्रार महिलेच्या भावाने पोलिसात दाखल केलेली होती तर महिलेच्या पतीने आपल्या पत्नीला कावीळ झाली होती त्यात तिचा मृत्यू झालेला आहे असे म्हटले आहे.
पतीच्या म्हणण्यानुसार, माझी पत्नी आजारी होती तिच्यावर औषधोपचार देखील सुरू होते मात्र तिचा आजार बळावला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. आमचा मुलगा अंत्यसंस्कारासाठी मुंबईवरून येणार असल्याकारणाने आम्ही तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवलेला होता. पोलिसांना हा प्रकार कळाला आणि त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. मयत महिलेचे वय 40 वर्ष असल्याचे समजते.
मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीमध्ये माझ्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर मला किंवा माझ्या इतर कुठल्याही नातेवाईकाला कळवण्यात आलेले नव्हते. माझ्या बहिणीला पती हा कायम मारहाण करत असायचा त्यामुळे तिचा मृत्यू हा घातपात असल्याचा माझा संशय आहे असे म्हटलेले आहे. शवविच्छेदन अहवाल हाती येईपर्यंत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नसून महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे.