महाराष्ट्रात एक अजब असे प्रकरण सध्या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी इथे समोर आलेले असून कोंबड्यांसाठी आणलेले औषध दारू असल्याचा समज झाल्याने एका कामगाराने हे औषध पिल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे तर आणखीन एक जण उपचार घेत आहे . माढा तालुक्यातील कुर्डू येथील ही घटना असून सदर घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सतीश महादेव शिंदे ( वय 45 राहणार कुर्डूवाडी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून शुभम बोराडे नावाच्या एका व्यक्तीच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्म असून या पोल्ट्री फार्म साफसफाईसाठी त्यांनी कुर्डूवाडी येथील रहिवासी असलेले चंद्रकांत कुलकर्णी यांना सांगितलेले होते त्यानंतर कुलकर्णी हे १९ तारखेला सकाळी सात वाजता कर्मचारी असलेले सतीश महादेव शिंदे याच्यासोबत इतरही काही कर्मचाऱ्यांना घेऊन कुर्डू येथे गेलेले होते.
सकाळी दहाच्या सुमारास सतीश महादेव शिंदे आणि त्याच्यासोबत असलेले भास्कर श्रीमंत माने हे एका ड्रमच्या शेजारी बसून काहीतरी पीत होते त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि तात्काळ पोल्ट्री फार्म मालक असलेले शुभम बोराडे यांनी त्यांना कुर्डूवाडी येथील सरकारी दवाखान्यात आणले त्यावेळी सतीश शिंदे यांचा मृत्यू झालेला होता तर भास्कर माने यांच्यावर तात्काळ औषधोपचार केल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आलेले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन गोरे करत असल्याची माहिती आहे.