शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली असून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या रोज येऊन पडत आहेत अशा परिस्थितीत शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात चक्क मद्यधुंद अवस्थेत वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला 21 तारखेला निलंबित करण्यात आलेले आहे. पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी यासंदर्भात आदेश जारी केलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , प्रेमचंद भानुदास वेदपाठक असे आरोपीचे नाव असून शिवाजीनगर वाहतूक शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर ते कार्यरत होते . काही दिवसांपूर्वी मॉडेल कॉलनी परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनचालकांना अडवून दंडाच्या नावाखाली ते पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. एका महिलेने शिवाजीनगर वाहतूक विभागाकडे तक्रार केली आणि तक्रारीत दोषी आढळल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे.