महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना बीड शहरात समोर आलेली असून अंकुशनगर भागात एका पदवीधर डॉक्टर मुलाने मध्यरात्री वडिलांच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून त्यांचा खून केलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून एका पदवीधर परीक्षेत हा तरुण नापास झालेला असल्याकारणाने त्याला मोठा धक्का बसला होता आणि त्यातून तो मनोरुग्ण झालेला होता. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुरेश काशिनाथ कुलकर्णी ( वय 70 ) हे आपल्या कुटुंबासह अंकुशनगर भागात गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. त्यांना सुधीर कुलकर्णी नावाचा मुलगा आहे. सुधीर हा बीएएमएसची पदवी घेऊन एमडी परीक्षेची तयारी करत होता मात्र परीक्षेत अपयश आल्याने तो नैराश्यात गेला आणि त्यातून त्याची मानसिक स्थिती ढासळली होती. रस्त्याने तो विनाकारण हिंडत असायचा आणि अंगावर कपडे देखील ठेवत नव्हता.
सुधीर याच्याविषयी अनेक नागरिकांनी पोलिसात देखील तक्रार केलेली होती त्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना तो मनोरुग्ण असल्याकारणाने घरात ठेवण्याचा देखील सल्ला दिलेला होता. याआधी देखील त्याने अनेकदा वडिलांवर हल्ला केलेला होता मात्र रात्रीच्या सुमारास वडिलांच्या मदतीला कोणी नसल्याने त्याने वडिलांवर हल्ला केला आणि त्याच्या हल्ल्यात सुरेश कुलकर्णी हे गंभीररित्या जखमी झालेले होते. त्यांना नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र अखेर त्यांनी या प्रकरणात प्राण गमावलेले आहेत. मनोरुग्ण असलेल्या सुधीर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून सर्वसाधारणपणे शांत राहणाऱ्या कुटुंबामध्ये ही घटना घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .