महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे . मनसे सोडल्यानंतर त्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आता खरी ठरली असून त्यांनी जाहीररीत्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे .
त्याच्या पक्षप्रवेशावर अजित पवार यांनी,’ रुपालीताई धडाकेबाज आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही. पुणे भागात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचं नाव लौकिक आहे. आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असला तरी येत्या काळात पक्षाकडून आणखी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे ‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे .
मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.