अखेर मुंबईबाबत राज्य सरकारचा ‘ मोठा ‘ निर्णय

Spread the love

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी राहणार आहे.

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ७३ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३२ प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांचा बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय राजस्थानमध्ये आतापर्यंत १७ प्रकरणे समोर आली आहेत. राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे सहा, केरळमध्ये पाच, गुजरातमध्ये चार, कर्नाटक, तेलंगणामध्ये तीन आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, चंदीगड आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

मुंबई पोलीस उपायुक्त आणि बृहन्मुंबईचे कार्यकारी दंडाधिकारी चैतन्य एस यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शहरात ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू राहील. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता हे निर्बंध आवश्यक आहेत तसेच केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दुकाने, आस्थापना आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची परवानगी आहे तसेच कोणताही कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच समाविष्ट करण्यास सांगितले आहे.

नवीन अधिसूचनेनुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना लसीकरण करणे अनिवार्य झाले आहे. लसीकरण न केल्यास, त्यांना राज्यात प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक दाखवावा लागेल आणि हा अहवाल ७२ तासांपेक्षा पूर्वीचा नसावा.


Spread the love