प्रेमविवाह करणाऱ्या पत्नीने मित्रांची मदत घेत स्वतःच्याच घरात मारला डल्ला

Spread the love

सोशल मीडियावर सध्या नागपूर येथील एका प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून दोन मित्रांच्या माध्यमातून एका विवाहित महिलेने तिच्या नवऱ्याच्या घरी चोरी करून तब्बल साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल गायब केलेला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली असून आरोपी बायको सध्या पोलीस कोठडीत आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शिवानी सुमित यादव ( वय 24 ), रजत दोंडलकर ( वय 23 ), हर्ष पानतावणे ( वय 24 तिघेही राहणारे रामटेक ) अशी आरोपींची नावे असून घरफोडीची ही घटना 30 जून रोजी दुपारी चार ते आठ या दरम्यान घडलेली होती. शिवानी हिने तिच्या दोन्ही मित्रांना सोबत घेऊन मोबाईलने घराचे व्हिडिओ चित्रीकरण करून चोरीची योजना आखली होती. शिवानी हिने मोबाईलने घराचे व्हिडिओ चित्रीकरण करून मित्रांना व्हाट्सअप वर पाठवले आणि त्यानंतर चारच्या सुमारास पतीला घेऊन एका ठिकाणी पाहुणचारासाठी म्हणून ती गेलेली होती.

दरम्यानच्या काळात आरोपी व्यक्तींनी तोंडाला दुपट्टा लावून घराचे कुलूप तोडले आणि त्यानंतर घरातील रोख सहा लाख 75 हजार रुपये आणि पाच लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व इतरही काही दागिने असे एकूण 13 लाख 60 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पळवला. संध्याकाळी आठच्या सुमारास पती-पत्नी घरी आले त्यावेळी घरफोडी केल्याचे समजले आणि पतीने तात्काळ पोलिसात तक्रार दिली.

पोलीस तपास सुरू असतानाच सुमित याची पत्नी हीच संशयाच्या भोवऱ्यात आली आणि तिनेच हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे . धक्कादायक बाब म्हणजे शिवानी आणि सुमित यांनी प्रेमविवाह केलेला असून दहा वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते मात्र घरातून विरोध झाल्यानंतर अखेर सुमित याने शिवानी सोबतच विवाह केलेला होता. तिनेच पतीच्या घरात चोरी केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तिच्या दोन मित्रांचा सध्या शोध घेत आहेत.


Spread the love