आपल्या फेसबुक फ्रेंडने आपण स्वतः पोलीस असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार करून आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिसात एका 26 वर्षीय तरुणीने दिलेली असून एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , राहुल चौधरी ( वय 24 राहणार रामनगर तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा ) असे याप्रकरणी आरोपीचे नाव असून पीडित तरुणी ही अमरावती शहरात खाजगी नोकरीसाठी भाड्याने एका ठिकाणी घरात राहत होती. फेसबुकच्या माध्यमातून तिला आरोपी राहुल याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झालेले होते.
आरोपी व्यक्तीने तरुणीला आपण स्वतः पोलिसात आहोत अशी माहिती दिली आणि नागपूर पोलिसात आपण कार्यरत आहोत असे सांगत पोलिसाच्या युनिफॉर्म मध्ये काही फोटो देखील पाठवले त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये तो तिच्या खोलीवर आला आणि त्यानंतर आपण आता लग्नच करणार आहोत असे सांगत तिच्यावर अत्याचार केला असे पीडित तरुणीचे म्हणणे असून आरोपी आता लग्नाला नकार देत आहे असे देखील तिचे म्हणणे आहे.