कंपनीतील आर्थिक ताळेबंद ठीक रहावा यासाठी चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली होती मात्र सीए असलेल्या या व्यक्तीची नियत बदलली आणि त्याने मालकाची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. नागपूर येथील सीताबर्डी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अनुप चारुदत्त सगदेव ( वय पन्नास समर्थनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एका लॉजिस्टिक कंपनीचे मालक असलेल्या व्यक्तीचे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते काम करत होते. कंपनीचा सर्व व्यवहार ते पाहत असताना कंपनीचे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या सिताबर्डी शाखेत खाते होते त्यावेळी सगदेव याने कामाचे कारण दाखवत काही कोरे चेक सही करून घेतलेले होते.
आरोपी व्यक्तीने त्यानंतर बँक खात्याचा गैरवापर करून 11 डिसेंबर 2013 पासून तर 27 जानेवारी 2015 पर्यंत तब्बल चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आणि त्या मार्गाने आलेल्या रकमा आपल्या नातेवाईकांच्या खात्यात मिळवलेल्या होत्या. आरोपी व्यक्तीने त्यानंतर देखील तक्रारदार व्यक्ती यांना कुठलीही माहिती न देताना एक दुसरे पॅन कार्ड काढले आणि अनेक ठिकाणी त्याचा देखील गैरवापर केला. बऱ्याच कालावधीनंतर ही बाब तक्रारदार व्यक्ती यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तो फरार झाल्याचे समजते.