महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होताना दिसत असून चक्क अल्पवयीन मुली देखील काही विकृत व्यक्तींच्या निशाणावर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत असाच एक प्रकार समोर आलेला असून लहान बहिणीला शाळेत सोडून घरी एक मुलगी परतत असताना तिचा पाठलाग केला आणि इमारतीत प्रवेश करत असतानाच तिला पाचव्या मजल्यावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगासोबत पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अभिषेक प्रेमचंद गौड ( वय 22 वर्ष ) असे आरोपीचे नाव असून तो साकीनाका परिसरातील रहिवासी आहे. आपल्या लहान बहिणीला शाळेत सोडून ही अल्पवयीन मुलगी घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिचा हात पकडून तिला पाचव्या मजल्यावर घेऊन गेला.
तिथे घेऊन गेल्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करणार इतक्यात कुणीतरी येत असल्याची चाहूल त्याला लागली आणि त्याने तिथून पळ काढला. मुलगी देखील घाबरून घरी आली आणि तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला त्यानंतर तात्काळ त्यांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंदवात आरोपीला अटक केलेली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.