महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून ऑनलाइन जुगार , क्रिकेट बेटिंग यातून तरुण पिढी संपत चालण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे. असेच एक प्रकरण गोंदियात समोर आलेले असून गांजा क्रिकेट सट्टा आणि मित्रमंडळींकडून घेतलेली हातउसनी रक्कम यामुळे सातत्याने आलेली आर्थिक अडचण यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नीरजकुमार मानकानी ( वय 24 वर्ष राहणार श्रीनगर गोंदिया ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून नीरजकुमार हा मोबाईल विकून पैसे कमवत होता. नागपूरवरून मोबाईल कमी किमतीत घ्यायचा आणि तो गोंदिया परिसरात संपर्कातील व्यक्तींना तो विकायचा आणि त्यात मिळत असलेल्या पैशातून त्याची कुटुंबाची उपजीविका सुरू होती. त्याच्या वडिलांचे निधन 11 वर्षांपूर्वी झालेल्या असल्याने तो आईसोबत गोंदिया इथे राहत होता .
आर्थिक अडचण आल्यानंतर त्याने मित्रांकडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपये उसने घेतलेले होते मात्र याच दरम्यान त्याला ऑनलाइन गेमिंगची सवय लागली . त्याच्याकडे पैसेच नसल्याने त्याने या खेळात जास्त पैसे अडकवलेले नव्हते मात्र वेळोवेळी आलेल्या आर्थिक अडचणीतून त्याने मित्रांकडून पैसे घेतले आणि क्रिकेटमध्ये देखील काही प्रमाणात तो बेटिंग करत असायचा त्यातून त्याने हा प्रकार केल्याची चर्चा गोंदियात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी ऑनलाइन गेमिंग आणि सट्टा व्यवसाय तेजीत आलेला असून नामांकित क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटीदेखील त्याची जाहिरात करत असल्याने या व्यक्तींना देखील समाजाचे काही भान आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांना आदर्श मानणारी तरुण पिढी यामुळे ऑनलाईन सापळ्यात अडकत असून युवक आणि अल्पवयीन मुले देखील स्वतःचे आयुष्य यात खराब करून घेत आहेत. क्रिकेट ऑनलाईन बेटिंग , सट्टा या प्रकारात काम करणाऱ्या मुख्य लोकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.