साईबाबांच्या पवित्र शिर्डीच्या नावाला गालबोट लावण्याचे काम काही व्यावसायिक करत असून शिर्डीतील काही हॉटेलमध्ये चक्क वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण पुन्हा एकदा शिर्डीत समोर आलेले असून रुई शिवारातील साई निवारा येथील एका बंगल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी छापा टाकून एका पीडित मुलीची सुटका केलेली आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची शिर्डी येथे बदली होताच त्यांनी तात्काळ शिर्डीतील हॉटेल आणि लॉजिंग असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या अशा प्रकारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलेला असून बुधवारी रात्री मिटके यांना रुई शिवारातील साईनिवारा येथील बंगल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती त्यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली होती.
बनावट ग्राहक आणि पंचांसमक्ष तिथे छापा टाकण्यात आला आणि एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली. दौलत किसन लटके ( वय 47 राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर ) आणि अंकुश संजय घोडके ( राहणार कालिका नगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तीर्थस्थानाच्या ठिकाणी सुरू असलेल्या या वेश्याव्यवसायावर कारवाई केल्याबद्दल साईभक्त आणि शिर्डी येथील नागरिकांकडून संदीप मिटके यांचे कौतुक केले जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.