मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा एक प्रकार मुंबईत समोर आलेला असून एका दवाखान्यामध्ये मयत झालेल्या एका महिलेच्या कानातील सोन्याचे झुमके चोरण्यासाठी चक्क महिलेचे कान कापण्याचा प्रकार समोर आलेला आहे. मुंबईतील सायन येथील लायन ताराचंद बापा हॉस्पिटल येथील हे प्रकरण आहे.
सदर रुग्णालयात एक महिला मयत झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी या महिलेचा मृतदेह घरी आणलेला होता त्यावेळी तिच्या कानातून रक्त येत होते आणि कानातील सोन्याचे झुमके गायब झालेले होते. मुलाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा रुग्णालयात जाऊन चांगलाच गोंधळ घातला त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अखेर सोन्याचे झुमके परत केलेले आहेत. माटुंगा पोलिसांना देखील यावेळी बोलावण्यात आलेले होते मात्र पोलिसांनी कुठली ठोस कारवाई केली नाही असा देखील आरोप मयत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेला आहे.
भारतीय दंड विधान कलम 297 नुसार मृतदेहाची विटंबना तसेच हेळसांड केल्यास एक वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही एकत्रितरित्या शिक्षा होऊ शकते . मृतदेहाची हेळसांड करणे , विटंबना करणे , अडवणे , अंत्यसंस्कार रोखणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र या प्रकरणांमध्ये पोलिसांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केलेला आहे.