शासकीय कार्यालयात महिला काम करत असताना त्यांना अनेकदा पुरुष सहकाऱ्याकडून भेदभाव केला जात असल्याच्या घटना समोर येत असतात मात्र अनेकदा प्रकरण त्याही पुढे जाते. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात घोडपेठ इथे सुभाष सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात समोर आलेले असून महिला लिपिकाचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच विनयभंग केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आलेला आहे . सदर व्यक्ती हा सुभाष सेवा सहकारी संस्थेचा अध्यक्ष असून त्याला अटकही करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विनोद घुगुल ( वय 53 ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मंडळी निघून गेल्यानंतर त्याने या महिलेला अधिक वेळ थांबायला लावलेले होते. दहा वाजण्याच्या सुमारास ऑफिसमध्ये कोणीही नाही याचा गैरफायदा घेत त्याने महिलेसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिला या प्रकारानंतर घाबरून गेली आणि तिने तात्काळ तिच्या पतीला फोन केला त्यानंतर पती-पत्नीने भद्रावती पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. आरोपी विनोद याने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने महिला लिपीकासोबत गैरवर्तन केलेले असल्याचे पीडीतेचे म्हणणे आहे. महिलेच्या पतीने देखील त्याला अनेकदा समजावून सांगितलेले होते मात्र त्याच्यात बदल झाला नाही म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलेली आहे.