शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून काहीतरी कारण काढून खंडणी उकळण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. एका महिलेने हॉटेल व्यवसायिकाला आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून एक लाख 80 हजार रुपये खंडणी उकळली. विमानतळ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटेल व्यवसायिकाने या संदर्भात फिर्याद दिलेली असून आरोपी महिला ही हॉटेल व्यवसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले होते मात्र महिलेने त्याचा वापर खंडणी उकळण्यासाठी केला असा आरोप तक्रारदार व्यक्ती यांनी केलेला आहे. खंडणीसाठी या महिलेने तक्रारदार व्यक्ती यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात तिला यश आले नाही.
आरोपी महिलेने त्यानंतर या हॉटेल व्यावसायिकाला वेळोवेळी संपर्क करत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी देखील धमकी दिली मात्र हॉटेल व्यावसायिकाने तिचा प्रत्येक डाव हाणून पाडला. आपल्याला काहीही करून त्याला वश करण्यात यश येत नाही हे लक्षात आल्यानंतर तिने तक्रारदार व्यक्ती यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुझी सगळ्या नातेवाईकात बदनामी करून टाकीन , अशी देखील धमकी दिली.
तिच्या या धमकीनंतर तक्रारदार हतबल झाले आणि अखेर त्यांनी एक लाख वीस हजार रुपये तिला दिले . प्रकरण इतक्यावर मिटेल असे त्यांना वाटले होते मात्र पुन्हा एकदा तिने त्यांच्याकडे साठ हजार रुपयांची खंडणी मागितली . पुन्हा एकदा या व्यवसायिकांनी तिला साठ हजार रुपये देखील दिले मात्र तरीदेखील तिची पैशाची भूक भागत नसल्याने अखेर तक्रारदार व्यक्ती यांनी पोलिसात जाऊन तिच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.