महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून कर्जबाजारी झालेल्या बापाने आपल्या मुलीला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून गळफास घेतला आहे . ” गीतांजली तुझा बाप कर्जबाजारी झालाय, घेतलेले कर्जफेडू शकत नसल्याने जिवन असहाय्य झाले आहे. लवकर मातीला ये…” असं लेकीला फोनवर बोलून 42 वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब लक्ष्मण गोंडे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून परिसरात घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे . बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात चिंचोटी गावात ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बालासाहेब लक्ष्मण गोंडे यांची पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दीड एकर शेती असून रात्री 9 वाजता घरातील मंडळीना शेतात चाललो असून गोठ्यावरच झोपणार आहे असं म्हणून शेतात गेले आणि सकाळी सहा वाजता नादलगांव इथे राहत असलेल्या मुलीला फोन करून ‘ गीतांजली तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, शेतातील पिक देखील यंदा आले नाही संपूर्ण पिक वाया गेले आहे. यामूळे मी खूप खचून गेलो आहे. आता तू सासर घरुन लवकर निघ… मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे ‘ असे म्हणून फोन कट केला.
सकाळीच वडिलांचा असा फोन आल्याने मुलगी घाबरून गेली आणि तिने आपला चुलत भाऊ असणाऱ्या कालिदास रामकिसन गोंडे यांना फोन करून लवकर शेतात जा असे सांगितले . कालीदास गोंडे यांनी तात्काळ काही अंतरावर असलेला पुतण्या युवराज दिलीप गोंडे याला फोन केला आणि त्यानंतर लगेच युवराज गोंडे यांनी शेताकडे धाव घेतली मात्र बाळासाहेब लक्ष्मण गोंडे यांनी तोपर्यंत फास घेतलेला होता आणि त्यात त्यांचा मृत्यूही झाला होता.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले आणि पंचनामा केला. मयत शेतकरी बाळासाहेब गोंडे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, अविवाहित एक मुलगी व दोन विवाहित मुलीसह 10 वर्षांचा एकुलता एक मुलगा आहे.