आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा देणाऱ्या शासकीय यंत्रणेला धमकीचा एक नवी ईमेल आलेला होता त्यानंतर याप्रकरणी तपासाला सुरुवात करण्यात आली आणि तपासाचे धागेदोरे हे अखेर एका भारतीय महिलेपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. सदर महिला एका पाकिस्तानी नागरिकाला देखील भेटलेली असून तिच्या व्यापारी पतीने डिसेंबर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक सिडको पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केलेली होती. सदर महिला सध्या मालेगाव मध्ये तिच्या पालकांसोबत राहत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील संबंधित विवाहित महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विदेशी तरुणासोबत ओळख झालेली होती त्यानंतर ही महिला डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर इथून गायब झाली आणि सौदी अरेबिया येथे पोहोचली. इकडे तिचा पती तिचा शोध घेत होता त्यानंतर ती सौदी अरेबिया तसेच इतर काही देशात राहिली आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा भारतात परतली.
आपली पत्नी भारतात आल्यानंतर तरी आपल्या घरी येईल अशी पतीला अपेक्षा होती मात्र ती तिच्या घरी न जाता मालेगाव येथील तिच्या माहेरी गेली आणि तिथेच राहू लागली. सद्य परिस्थितीत ही महिला मालेगाव इथेच राहत असून औरंगाबाद पोलिसांना याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजी एक ईमेल प्राप्त झालेला होता त्यामध्ये परदेशात गेल्यानंतर ही महिला काही देश विघातक कृत्यात सहभागी झाल्याचा देखील ई-मेल मध्ये उल्लेख आहे. त्या अनुषंगाने या महिलेची सध्या चौकशी सुरू आहे .
सदर महिला ही एका पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे देखील समोर आलेले असून या पाकिस्तानी कुटुंबातील एक सदस्य हा पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. एटीएसचे अधिकारी या महिलेची आता कसून चौकशी करत असून पाकिस्तानी नागरिकासोबत तिने पुन्हा विवाह केला आणि त्यानंतर ती भारतात परतली असे देखील समोर आलेले आहे. महिलेचे वय 32 वर्षे असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची या पाकिस्तानी सोबत ओळख झाली होती.