फसवणुकीचा एक अजब प्रकार पुण्यात समोर आलेला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट सर्च करत असताना अनोळखी मोबाईल नंबर मिळाला आणि त्यावर संपर्क करून पेमेंट देखील करण्यात आले मात्र अद्यापही हे प्रॉडक्ट तक्रारदार व्यक्ती यांच्या दारात पोहोचलेले नाही.
उपलब्ध माहितीनुसार , विनय विजय कुलकर्णी ( वय 41 वर्ष राहणार बिबबेवाडी ) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून कुलकर्णी यांनी जी आय कॉईल दोन एम एम हे प्रॉडक्ट गुगलवर सर्च केलेले होते त्यावेळी त्यांना एक नंबर मिळाला आणि त्या व्यक्तीसोबत त्यांनी संभाषण केले. तुम्हाला पाहिजे असलेला माल आमच्याकडे उपलब्ध आहे त्यासाठी कंपनीच्या नावाने इन्व्हाईस बनवून तुमचे प्रॉडक्ट तुम्हाला पाठवून देऊ , असे सांगण्यात आलेले होते.
तक्रारदार व्यक्ती यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि पाच लाख 432 रुपयांचे पेमेंट ऑनलाईन केले मात्र त्यांना कुठलेही प्रॉडक्ट मिळाले नाही. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.