महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कराड इथे समोर आलेली होती. शिकवणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या शिकवणी चालकाला तीन वर्षे सश्रम कारावास आणि चाळीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अविनाश गणेश फाटक ( वय 64 राहणार निराळी अपार्टमेंट शिंदे नगर कोयना वसाहत मलकापूर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपी हा खाजगी शिकवणी घेत असताना त्याच्याकडे अल्पवयीन मुलगी शिकण्यासाठी येत होती त्यावेळी त्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यासोबत लगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मुलीच्या पालकांनी तात्काळ कराड शहर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती त्यानंतर अविनाश फाटक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी एस शादीवान यांनी आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले साक्षी पुरावे यावरून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.