महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना बीड इथे समोर आलेली असून मित्रांच्या मदतीने सख्या भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केलेली आहे. गेवराई शहराजवळील मनारवाडी येथे ही घटना घडलेली असून अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मनोहर पुंडे असे मयत व्यक्ती यांचे नाव असून मनोहर याला दारूचे व्यसन होते. दारू पिण्यासाठी पैसे नसले तर तो कुणाकडून तरी पैसे घ्यायचा आणि उधारीच्या पैशावर दारू प्यायचा. दारूच्या कारणासाठी त्याने व्याजानेदेखील अनेक जणांकडून पैसे घेतलेले होते आणि हे पैसे त्याचा लहान भाऊ सतत परत करत असायचा त्यामुळे मनोहर हा अशाच पद्धतीला सोकावलेला होता. लहान भाऊ असलेला आरोपी दर्शन पुंडे याने अनेकदा सांगून देखील भावाच्या वर्तनात बदल होत नसल्याने मित्रांच्या मदतीने त्याने भावाचा खून केलेला आहे.
मनोहर पुंडे याचा मृतदेह शहरापासून जवळ असलेल्या एका शिवारात आढळून आलेला होता. पोलीस तपासात लहान भाऊच आरोपी निघाल्यानंतर पोलीस देखील चकित झाले. मोठा भाऊ सारखे व्याजाने पैसे घ्यायचा आणि हे पैसे दारूत उडवायचा त्यामुळे आरोपी हतबल झालेला होता. गेवराई पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.