एकदा कर्ज घेतल्यानंतर त्यानंतर जो काही ससेमीरा पाठीमागे लागतो त्यातून अनेकदा नागरिक देखील वैतागून जातात . असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आलेला असून जिल्हा बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर जमिनीच्या होणाऱ्या लिलावाची धास्ती घेतल्यानंतर एका शेतकऱ्याचे अखेर हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालेले आहे. दिंडोरी तालुक्यातील ही घटना असून बँकेच्या जाचामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे असा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दिलीप अमृता चौधरी ( वय 49 ) असे मयत शेतकरी यांचे नाव असून ते दिंडोरी तालुक्यातील पिंपरी आंचला येथील रहिवासी आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलेले होते मात्र शेतीतून त्यांना पुरेशे उत्पन्न मिळाले नाही म्हणून ते कर्ज फेडू शकले नाहीत अशा परिस्थितीत जिल्हा बँकेने त्यांच्याकडे सातत्याने तगादा सुरू केला मात्र शेतकरी हतबल असल्याकारणाने त्यांना परतफेड करण्यात अपयश येत होते.
बँकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना वसुलीसाठी नोटीसा पाठवण्यात आल्या त्यानंतर अखेर कर्ज वसुलीसाठी जमिनीचाच लिलाव केला जाईल अशी तंबी बँकेने दिली म्हणून आपली जमीन जाईल या भीतीने ते धास्तावून गेलेले होते. त्यात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला असून जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीबद्दल अनेक ग्रामस्थांच्या अनेक शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.