महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना डोंबिवली इथे समोर आलेली असून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याकारणाने एका भाजीविक्रेत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडलेली असून मयत व्यक्तीचे वय 42 वर्षे आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही जणांची नावे लिहीत त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सुनील म्हस्के ( वय 42 राहणार कोळेगाव डोंबिवली ) असे मयत भाजी विक्रेत्याचे नाव असून ते डोंबिवली पूर्व येथील कृष्ण नगर परिसरात पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत होते. भाजी विक्रीसोबतच पेंटिंगची कामे करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी रविकिरण नावाच्या एका व्यक्तीकडून गाळा भाड्याने घेतला होता मात्र लाईट बिल भरणे झाले नाही म्हणून रविकिरण यांनी गाळ्याला कुलूप लावून टाकले.
सुनील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मदत मागितली त्यानंतर गाळा पुन्हा उघडून देण्यात आला मात्र गाड्याचे भाडे आणि लाईट बिल भरण्यासाठी रविकिरण हा सतत त्यांच्याकडे पैशाचा तगादा करत होता तर दुसरीकडे सुनील जिथे राहायचे त्या सोसायटीचे देखील त्यांनी काही काम केलेले होते आणि सोसायटीचे सचिव कदम आणि मूर्ती यांनी देखील या कामाचे पैसे सुनील यांना दिले नाहीत.
दुसरीकडे रविकिरण याचा पैशाचा तगादा सतत सुरू होता म्हणून सुनील यांनी अखेर दत्ता भंडारी नावाच्या एका व्यक्तीकडून काही काळ पैसे घेतले आणि भंडारी याचा देखील पैशासाठी पाठपुरावा सुरू झाला. हतबल झाल्यानंतर अखेर सुनील यांनी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली आहे.