शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका भंगार व्यवसायिकाच्या 14 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आणि खंडणी दिली नाही तर त्याचे हातपाय तोडून त्याला मारून टाकू अशी धमकी देण्यात आलेली होती मात्र पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अपहरण करणाऱ्या व्यक्तींना अटक केली आहे व मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , तेजस ज्ञानोबा लोखंडे ( वय 21 ), अर्जुन सुरेश राठोड ( वय 19 दोघेही राहणार दत्त मंदिर शेजारी मारुंजी गाव ) , विकास संजय मस्के ( वय 22 राहणार शिवार वस्ती भुमकर चौक ) अशी संशयित व्यक्तींची नावे असून 12 तारखेला ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली होती. हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी पैशाची गरज असल्याने आरोपींनी हा प्रकार केल्याचे समोर आलेले आहे.
ताथवडे येथील एका भंगार व्यावसायिकाच्या 14 वर्षांच्या मुलाचे कारमधून वरील संशयित आरोपींनी अपहरण केलेले होते. सकाळी सात वाजता हा प्रकार केल्याची माहिती पोलीस हवलदार मोहम्मद गौस नदाफ यांना मिळाली आणि त्यानंतर वरिष्ठांनी याप्रकरणी दखल घेत तात्काळ गुन्हे शाखा युनिट चारचे पथक सक्रिय केलेले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला त्यावेळी तीन व्यक्ती एका निळ्या रंगाच्या गाडीत मुलाचे अपहरण करताना दिसून आले.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यानंतर सर्वप्रथम मुलाच्या काकाची विचारपूस केली आणि त्यांच्याकडे चौकशी करून माहिती काढण्यास सांगितले. मुलाच्या काकाला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून तीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी दिली नाही तर मुलाचे हातपाय तोडून टाकू आणि त्याला मारून टाकू अशी धमकी दिलेली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे.