देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना गुजरातमध्ये उघडकीस आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी सूरतमधील न्यू सिटी लाइट भागातील एका प्रमुख बिल्डरच्या ऑफिसात तब्बल 1 कोटी रुपयांची चोरी झाली होती. क्राइम ब्रान्चच्या टीमने बुधवारी मध्य प्रदेशातून दोन भावांना अटक केली आहे. एमपाल मंडलोई पटेल आणि त्याचा भाऊ नेपाल अशी आरोपींची नावे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, एमपाल मंडलोई वेस्टर्न कंस्ट्रक्शनच्या कार्यालयात आरोपी ऑफिस बॉयची नोकरी करीत होता. तो कॅश कुठे ठेवली जाते याकडे लक्ष देत होता. लॉकरच्या चाव्या कुठे आहेत हे देखील त्याला माहिती झालं होतं. संधी साधून त्याने कार्यालयातच चोरी केली. अटकेनंतर त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणासाठी 5 लाखांचं कर्ज घेतलं होत ते फेडण्यासाठी त्याने ही चोरी केली .
सूरत पोलिसांनी एमपाल मंडलोई पटेल आणि त्याचा भाऊ नेपाल यांना अटक केली असून दोघेही घराजवळ खड्यात पैसे लपवून इंदूरमध्ये राहायला गेले होते. मुख्य आरोपी एका शिक्षित तरुणीवर प्रेम करीत होता. तिला मोठं अधिकारी व्हायचं होतं अन त्याच्या तयारीसाठी त्याला पैशांची गरज होती. गर्लफ्रेंडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपालने चोरी केली. त्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली असून या प्रकरणात तपास सुरू आहे.