देशात एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार समोर आलेला असून उधारी परत दिली नाही म्हणून एका भाजीविक्रेत्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला विवस्त्र करून संपूर्ण मार्केटमधून नग्न अवस्थेत त्याची धिंड काढण्यात आली. त्याला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आलेली असून भाजी मंडईतून त्याला नग्न अवस्थेत दुपारी दोनच्या सुमारास फिरवण्यात आले. सदर घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला असून मुख्य आरोपी असलेला सुंदर व लेखपाल यांस अटक करण्यात आलेली आहे तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मैनपुरी येथील हे प्रकरण असून पीडित भाजी विक्रेता हा फेज दोनमधील सेक्टर 88 मध्ये एका गाडीवर लसूण विकतो. त्याने सुंदर नावाच्या आरोपीकडून पाच हजार सहाशे रुपये उसने घेतलेले होते त्यानंतर त्याने सुंदरची भेट घेऊन त्याला पंचवीसशे रुपये दिले मात्र एकाच वेळी सर्व पैसे दिले नाही म्हणून संतापलेला सुंदर , त्याचा लेखपाल आणि दोन मजूर यांनी त्याला दुकानात कोंडून विवस्त्र केले लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर नग्न अवस्थेत त्याची भाजी मार्केटमध्ये धिंड काढली.
सदर घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीची मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली असून माध्यमांशी बोलताना त्याने ,’ मी आयुष्यभर कष्ट करून प्रामाणिकपणे मजूर म्हणून स्वाभिमानाने जगलेलो आहे मात्र या व्हिडिओमुळे माझी प्रतिष्ठा पूर्णपणे डागाळली आहे. मला आता असे वाटते की मी केवळ श्वास घेत आहे मात्र आतून पूर्णपणे तुटलेलो आहे. मी माझ्या जवळच्या व्यक्तींशी मान वर करून बोलू देखील शकत नाही आणि आता यापुढे भाजी बाजारात दुकान देखील लावता येणार नाही असे कुणाच्याही बाबतीत घडू नये , ‘ असे देखील त्यांनी पुढे म्हटलेले आहे.
सदर घटनेचे काही स्क्रीन शॉट देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत . व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजी विक्रेता एका बाकावर बसलेला आहे आणि काही जण त्याला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. बाहेर नेल्यानंतर त्याला दोन काठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी या व्यक्तीला विवस्त्र करून बाजारात फिरवण्यात येत होते त्यावेळी कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. असंवेदनशील झालेला समाज हा देखील अशा घटनांसाठी तितकाच जबाबदार आहे असे देखील या प्रकरणात समोर आलेले आहे.